WELCOME TO WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MUMBAI SOUTH DIVISION

Thursday, 23 April 2015

६ मे च्या बेमुदत संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा

मुम्बई शहर दक्षिण विभागातील सर्व कामगार बंधू – भगिनींनो, नमस्कार,
   आपणांस नम्रपुर्वक कळवित आहोत की,दिनांक ६ मे २०१५ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण भारतातील सर्व केंद्रीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्या दि. ६ मे च्या बेमुदत संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा. ही विनंती.
    कामगार मित्रहो,केवळ मौज म्हणून आंदोलनं केली जात नाहीत आणि संप तर जेव्हा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही,मालकाचा हेकेखोरपणा वाढत जातो,मालकाच्या चुकीच्या धोरणामुळे जेव्हा कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण होते, जेव्हा कामगारांचे सर्व हक्क पायदळी तुडवून त्याला वेठबिगार बनविण्याचा घाट घातला जातो, मालक चर्चेद्वारा प्रश्न सोडविण्याचे टाळतो किंवा कामगार आणि त्याचा परिवार यांचे जीवन ज्यावर सर्वस्वी अवलंबून आहे तो उद्द्योगच बंद करण्याचा प्रयत्न करतो; त्यावेळी कामगाराला त्याच्या भात्यातील शेवटचे अस्त्र उपसावे लागतेच.कारण त्याच्याकडे दोनच पर्याय असतात.एक म्हणजे मालकाच्या मनमानी पुढे झुकून,येईल त्या परिस्थितीत जगणे अथवा त्याच्या विरोधात प्रखर लढा उभारून लढवय्या प्रमाणे अन्यायाचा सामना करणे.
    आज हीच परिस्थिती केंद्रीय कर्मचाऱ्यांवर येऊ घातली आहे.आपला मालक (केंद्र सरकार) आज सर्व सामर्थ्यवान आहे. काहीही ऐकण्यास तयार नाही. प्रत्येक आर्थिक मागणीला नकार घंटाच वाजवली जात आहे.उद्योग धंदे गुंडाळण्याचे अथवा त्यांचे खाजगीकरण करून कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. “अच्छे दिन आयेंगे” म्हणत सत्तेवर आलेले केंद्र सरकार पूर्वीच्या सरकार पेक्षाही कठोरपणे मागील सरकारचीच धोरणे अत्यंत वेगाने हाकीत आहे.कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली सध्या कामगारांना सेवा – सुविधा,लाभ मिळत आहेत त्यात कपात करण्याचे अथवा पूर्णत: काढून घेण्याचे धोरण अवलंबित आहे.
   केंद्र सरकारने आजवर छुपी असलेली आपली वाघनखे बाहेर काढलेली आहेत.कर्मचारी संघटनांना विचारात न घेता “टपाल” विभागाचे “सहा” कंपन्यांमध्ये रुपांतर करून “टपाल” खात्याचे “खाजगीकरण” करण्याचा घाट घातला आहे.जर “टपाल” खात्याचे “खाजगीकरण” करण्यात आलेच तर आपलणही “बी.एस.एन.एल.” च्या कामगारांप्रमाणे धेशोधडीला लागु हे निर्विवाद सत्य आहे.
   आपले माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्व श्रीमंत आणि मध्यम वर्ग लोकांनी गॅस सिलिंडर चे अनुदान घेऊ नये असे जाहीर आवाहन केले आणि उद्या ते सर्व कामगारांना आवाहन करतील की,डी.ए./बोनस घेऊ नका. हे ही लक्षात घ्यायला हवे.
   “भू संपादन” कायदा करून हे सरकार भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बड्या उद्योगपतींच्या घश्यात घालून, गरीब शेतकऱ्यांना धेशोधडीला लावीत आहे.
   ही तर गरीब कष्टकरी शेतकरी,कामगार व सर्व केंद्र सरकारी कामगारांना देशोधडीला लावण्याची नांदी आहे.
   सन २००४ पासून जे कामगार केंद्र सरकारी सेवेत येतील त्यांना “पेन्शन” मिळणार नाही. सदर “नवीन पेन्शन योजना” कायदा मंजूर करण्यासाठी कॉंग्रेस सरकारला ह्याच
बीजेपी ने संसदेत मदत केली होती हे ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच ह्या सरकार विरोधात संघर्ष अटळ आहे.
   एन.एफ.पी.ई. आणि एफ.एन.पी.ओ. या दोन्ही संघटनांनी हा संभाव्य धोका लक्षात घेऊन दि. ६ मे २०१५ पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे.            
   तरी  सर्व कामगार बंधू – भगिनींनी, केंद्र सरकार च्या समर्थक आणि ज्यांनी कधीच इतर कामगारांसाठी “त्याग” न केलेल्या, कधीच संपात सहभाग न घेणाऱ्या, संप काळात कामावर हजर राहून काम न करता कसल्याही प्रकारची लाज-शरम न बाळगता “दाम” घेणाऱ्या कामगार द्रोहिंच्या अफवांवर विश्वास न ठेवता,कसल्याही आमिषाला बळी न पडता, दि. ६ मे च्या बेमुदत संपात सहभागी होऊन संप यशस्वी करावा. ही विनंती. 

कामगार एक जुटीचा विजय असो !आता नाही तर कधीच नाही.

ठळक मागण्या
(१)  १००% डी.ए.मर्ज करून दि.१ जानेवारी २०१४ पासून ७ वे पे कमिशन लागू करा.
(२)  २५% अंतरीम वाढ दि.१ जानेवारी २०१४ पासून द्या.
(३)  नवीन पेन्शन योजना रद्द करून,जुनी पेन्शन योजना लागू करा.
(४)  अनुकंपा धोरण तत्वाच्या भरतीतील ५% ची अट त्वरीत रद्द करा.
(५)  सिस्टीम एडमीन ची वेगळी पदे निर्माण करा.
(६)  पोस्टमन आणि एम.टी.एस.ची रिक्त पदे त्वरीत भरा.
(७)  पोस्टमन आणि एम.टी.एस. च्या भरतीच्या नियमात संशोधन करून बदल करा.
(८)  पोस्टमन आणि एम.टी.एस.ना चांगल्या प्रतीचे गणवेश आणि कीट द्या.
(९)  जुने कॉम्पुटर बदलून नवीन घ्या. नेटवर्क आणि बॅंडविथ ची क्षमता वाढवा. CBS & CIS 
          लागू करताना होणारी छळवणूक त्वरीत थांबवा.
(१०) पोस्टाच्या इमारती आणि स्टाफ क्वार्टर्स च्या दुरुस्ती साठी पुरेसा फंड उपलब्ध करा.
(११) पत्रांच्या डिलिव्हरी साठी च्या २२/०५/१९७९ च्या “टाईम फॅक्टर” मध्ये संशोधन करून बदल 
    करा.
(१२) आय.टी.मॉर्डनायझेशन प्रोजेक्ट,कॉम्पुटर,कोअर बँकिंग सोलुशन,कोअर इन्शुरन्स सोलुशन,
     संबंधित इश्यु सेटल करा.  
         आपले नम्र,
       कॉ. एस आर ए मजगावकर शाखा सचिव